केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

 21.may 2025.

       प्रिय व सुजाण, मुख्य म्हणजे सजग वाचक हो, काल एका छोट्या व अशिक्षित मुलाची, त्याच्या कुवती नुसार, आभार प्रदर्शनाची, रीत सांगितली. आज एका मुक्या जीवाची, एकनिष्ठ वर्तणूक वाचा. खरे तर आपण माणसाच्या, वाईट वागण्याचा उल्लेख, "पाशवी" असा सहजच करतो. पण पशू किती संवेदनशील असतात. त्याची सत्य कथा वाचा.

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

       हो. हे एक अजब असा अनुभव मनाला व जीवाला चटका देऊन गेला. आठवणीने ही मन भारावून जाते.

        झाले असे की, माझ्या.मुलांना कुत्रा पाळावयाचा होता. पण माहिमच्या दोन खोल्यांच्या जागेत , ते अशक्य होते. एक तर मीच परिस्थितिमुळे, माझ्या दोघा मुलांसह( प्रशांत व राहूल) आई-दादांकडे(वडील)  राहत होते. मुलांना त्याची जाणिव होती.मला भांडूपला क्वार्टर मिळाल्यावर, आम्ही आईदादांसह तेथे shift झालो. चार खोल्यांची प्रशस्त जागा अन् ती ही तळमजल्यावर, तेव्हा कुत्रा पाळायचा हे नक्की केले. एक तर मुलांची हौस व दुपारी आम्ही तिघे बाहेर पडल्यावर आजी दादांना सोबत. 

         अशा तर्‍हेने केव्हिनच आगमन झाले. तो काही जातीवंत नव्हता. रस्त्यातच जन्म झालेला साधासुधा जीव. पण झाले असे, माझ्या मुलांपेक्षा, तो जास्त वेळ दादाच्या( माझे वडील) सहवासात असे. दादांना खोबरे  खाण्याची आवड होती. त्यांच्या बरोबरीने, केव्हिनलाही खोबरे खायला लागे. न दिल्यास भिंत खरवडे. 

         तर दोन वर्षाने आम्ही मालाडला राहावयास गेलो. तेथे कळले, ह्या सोसायटीत कुत्रा पाळण्यास बंदी आहे. अाता प्रश्न पडला काय करावे, काही दिवसांनी , मी वांगणीला गेले होते. तेथे मी ऑफिसच्या सहकार्‍यांच्या बरोबरीने प्लॉट घेतला होता. तेथे श्री.विजय मोरेंशी ओळख झाली. अन् कळले त्यांना एका कुत्र्याची गरज आहे. मग केव्हिनला त्यांच्याहाती दिले. पण येताना मला व मुलांना रडू आले. असे ठरवले की, महिन्यातून दोनदा तरी , त्याला भेटायला जावयाचे.

          आमच्याकडे बाहेर जाताना आम्ही पट्टा बांधत असू. पण मोरेंची मुले बोलली, हे कशाला? आम्ही तर त्याला मोकळेच ठेवू. आम्हाला तो , "हरवला तर" अशी भिती वाटे. प्रत्येक वेळी वांगणीला स्टेशनवर उतरल्यावर, तो असेल ना, शंका मनी येई.पण गंमत म्हणजे मी किंवा मुले, 

त्यांच्या विहीरीजवळ पोहोचलो की तो आवाज देत, धावत  येत असे. त्याला न बघता, आमचे येणे, कसे कळे देव जाणे. हो, देवानेच त्यांना ही आत्मशक्ती दिलीय.

        तेथे जात असू, तेव्हा एक गंमत कळली. 

        त्याची( दादांमुळे लागलेली खोबरे खायची सवय) त्याला, विशिष्ट दिवशी, विशिष्ट देवळात वासावरून घेऊन जात असे. खोबरे मिळाल्यावरच, तो तेथून उठे. त्यामुळे वांगणीकर त्याला देवभक्त म्हणत व कविन्  हाकारत.

        पण १९९७ ला वांगणीस गेलेला केव्हीन तेथे रूळला. नंतर २००४ मध्ये दादा आजारी पडल्याने त्यावर्षी आमचे तेथे जाणे झाले नाही.  ऑगस्टच्या सात तारखेला, दादांचे निधन झाले. 

        त्यानंतर साधारण महिन्याने, मी वांगणीस गेले. तेथे प्लॉट घेतल्याने, बरोबर मैत्रिण मंगल दाऊ ही होती. त्यांच्या घरी पोहोचले, तरी केव्हिन दिसेना, अन् लक्षात आले, नेहमी प्रमाणे, विहीरीशी पोहोचल्यावर, न बघताच त्यांचे भुंकणे ही कानावर आले नाही.

        नवल म्हणजे आम्हाला बघून, त्या घरातील मंडळी कावरी बावरी झालेली वाटली. मी इकडे तिकडे बघत, मोठ्याने हाक दिली, केव्हिन, केव्हिन.  पण साद नाही.

        त्या वहिनी बोलल्या, तुम्ही आधी बसा जरा सांगते.

  चहा आला. मला वाटले, हा कुठच्या तरी देवळात टुकत बसला असेल. मी ते बोलून दाखवले. अन् दादांच्या आठवणीने, भरून आले. तेवढ्यात आत आलेल्या, विजय मोरेंनी विचारले. तुम्हाला कसे कळले? महीना झाला अचानकच सांयकाळी येऊन मान टाकली . मी दचकले. हो, दादांना  ही जाऊन . . . मी विचारले,"नेमकी तारीख काय व किती वाजता? तर त्यांच्या आई म्हणाल्या, अवो ताई, शनिवार होता बघा ७ तारखेला. सकाळधरनं काय बी खाल्ले नाय.  मारूतीच्या देवळात जाऊन बसला पण  नेहमी परमाने, लोकांनी,खोबरे समोर ठेवलेले, ते बी तसेच टाकून आला, अन् मान टाकली. पोरांना वाटले, नेहमी वानी कोणी त्याला नारळ फोडला नसेल, तर. . 

       " पण",भाऊ बोलले,  " मला जरा भलतेच वाटले, म्हून जवळ जाऊन बघितले, तर पराण गेलेला. सहा वाजले असतील. पण आम्ही,त्याला नीट बघत होतो हो." 

       तो पर्यंत मला दिवस वार व वेळ याची लिंक लागली होती. दादा ही ७ ऑगस्टला ५.३०वाजता देवाघरी गेले होते. तोच दिवस व तीच वेळ. मी तसे सांगितले. सर्वच सुन्न. तो फक्त ५वर्षाचा होता. खरे तर श्वानाचे आयुमान साधारण १०.१५ वर्षे असते.

        हे काय व कसे घडले, हे कोडे अजून ही उलघडले नाही. ना कोणी श्वानप्रेमी  स्पष्टीकरण देऊ शकले.

        केव्हिनची दादांप्रतिची निष्ठाच.

Comments

Popular posts from this blog

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू