कानडा विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियले वेधु।

 २१. ७. २१. बुधवार. आषाढ शुक्ल द्वादशी.

   काल आषाढी एकादशी झाली. एखादा सण वा पर्व संपले म्हणतो, आपण. पण अं हं. हे तर पर्व सुरू झालेय. ते काही एका दिवशीचे नाही तर चार महिने अहोरात्र चालणारे सत्र आहे. ३० दिन * ४ मास=  १२० दिवस निरंतर चालणारे व्रत आहे. ठिक आहे. सच्चे भक्त पंढरपुरी नाही पोहोचले. पण विठ्ठल रखुमाई आज कोठे त्या जागी आहेत? ते दोघे तर गावोगावी आपल्या मनस्वी भक्तांच्या भेटीस वणवण फिरत आहेत. बघा.समस्त वारकर्‍यांना विचारा बघू. कोणत्यातरी रूपाने, त्यांना त्यांचा विठुराया भेटलाच असणार, निश्चित. 

   आता माझेच बघा, मी कालचा लेख लिहिताना, अडले, पुंडलिकाच्या नावावर. वय बोलू लागले. मग मी  माझ्या मैत्रिणीला, सौ. अश्विनी(शैला)मनोहर वावीकरला फोन केला. तिला ही भजनाची आवड आहे. अर्थात लगेच सांगितले, तिने.  

   आज पुन्हा गडबड झाली. " कानडा विठ्ठलु करनाटकु। 

   ही अोळ असलेला ज्ञानदेवांचा अभंगाची सुरूवात आठवेना.  वहीत सापडेना. अन् असे म्हणावे लागले कि, मैत्रिण असावी तर अशी. शोधून थकले व मोबाईल उचलला तर शैलाचा मेसेज बघते तो काय, हाच अभंग. लगेच लिहायला सुरू करणार, तोच लक्षात आले, विठोबा.रखमाई

 नी आपल्या फिरतीवरून मला, शैलाच्या माध्यमातून, हा त्यांच्या लाडक्या ज्ञानियाचा अभंग, मला पोहोचता केला.  कारण माझ्या हातून तो, तुम्हा भक्तापर्यंत   न्यावयाचा आहे. अहो, आपली श्रध्दा त्या पांडुरंगापायी पावली. 

 तर आधी तो अभंग

       पांडुरंग कांति दिव्य तेज झळकती ।

       रत्नकिळा फाकती प्रभा।

       अगणित लावण्यतेज पुंजाळले। 

       न वर्णवे तेथीची शोभा ।।१।।

       कानडा तो विठ्ठलु करनाटकु।

       येणे मज लावियेला वेधु।

       खोळ बंधी घेउनि खुणाची पालवी।

       आळविता नेदी सादु ।। २।।

        कित्येकांकडून दुसर्‍या ओळीची सुरूवात, कन्नड व कर्नाटक अशी ऐकतेय. पण ते बरोबर नाही, हे मला लहानपणापासून माहित होते. मी माझ्या आजीचे (काकी म्हणत सर्वच तिला) शेपूट. साहजिक तिच्या सोबत देवळात भजन- किर्तन- प्रवचनात हजर. माझ्या आजीने एकदा आषाढीला, चातुर्मासासाठी, एक नेम धरला. तेव्हा समजत नव्हते, पण आज त्या माझ्या आजीची महानता कळतेय. तिने काय ठरवले माहितेय, सर्व देवळात येताना कोपर्‍यावरच्या, हारवालीकडून फुले तुळस हार विकत घेतात व पुण्य कमावतात. पण त्या माऊलीला कधी देवदर्शन वा प्रवचन ऐकायला मिळत नाही. तेव्हा तिला नेम असा कि, बाहेर आल्यावर, जे आत कानी पडलेय, ते  खड्या सुरात, फुलवाल्या बाईंना ऐकवायचे.  तर नेमका हा विषय त्या प्रवचनात व लगेच काकीच्या शैलीत ऐकला, हा अभंग अन् मनात ठसला. हं तर, मी आता एकदम दुसरा अभंग घेते.

        कानडा विठ्ठलु म्हणजे जो समजण्यास अगम्य आहे. बघा हं. पंढरपूरी जे जाऊन आलेत, त्यांनी नीट आठवा.  एकटक पाहिल्यावर असे वाटते, तो जणू आपल्याकडे कौतुकाने, पण अार्ततेने बघत आहे. खरे तर ते बघणे, मुखी नाम घेत, मातापित्याची सेवा करण्यात पुंडरिकाकडे आहे. जेव्हा कोणी कॅमेर्‍याकडे बघून बोलतो, तेव्हा तो व्हिडिओ बघणार्‍या, प्रेक्षकांना असे भासते कि, ती व्यक्ती आपल्याकडेच बघत आहे. तसेच या विठुरायाचे आहे. गंमत म्हणजे त्याच बरोबर असा कितीकाळ तिष्ठत राहू, या विटेवर म्हणून हात गेलेत कटीवर. असा हा विठुराया खरेच रहस्यमय आहे. तो कोणाच्या तरी रूपाने , जनतेत वावरतोय. भक्तमंडळींवर प्रसन्न होतोय. तर आपल्या जीवनात कशा स्वरूपात आला होता, आला अाहे व येणार आहे, याचा शोध घ्या. वेडावाकडा क्रॉस करताना "तोच" वाचवतो. पण आपल्याला "तेच" समजत नाही. सज्जनांना नाहक त्रास देणार्‍यासाठी, त्याची, काठी आवाज न करता वाजतेच. तर त्या परब्रम्हाला शोधा म्हणजे सापडेल. उद्यापासून हा अभंग समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू