गुरू कसा असावा, यापेक्षा कसा नसावा, इति समर्थ रामदास स्वामी (दासबोध).

 २५.७ .२१ . रविवार. आषाढ कृ. द्वितिया.

        आपण बघतोय कि, गुरू नेमका कोठचा योग्य, पण समर्थ रामदास स्वामींनी , दासबोधात हेही सांगितलेय कि, गुरू कसा नसावा. बरेचदा कोठचीही गोष्ट कशी असावी, ह्याचे वर्णन करणे, विस्तृत होते तरीही काही बाबी राहून जातात. तेव्हा सोपा मार्ग म्हणजे, त्या कशा नसाव्यात, हे ठरवले कि, scope नेटका व नेमका होतो. 

         हेच रामदास स्वामींनी दाखवून दिले अाहे.  चांगल्या व भल्या माणसाचे गुणधर्म न सांगता, ते मूर्ख लक्षण- पढतमूर्ख- कुविद्या-  बध्दलक्षण- चंचळ लक्षण- करंटलक्षण यावर निरूपण करतात. हे करंट मराठी करंट आहे बरे, english current नव्हे हं.  तसेच त्यांनी दासबोधाच्या ५व्या दशकात  १ल्या समासात, गुरू निश्चित कसा करावा, हे सांगितलेय. अन्  दुसर्‍या समासात गुरू लक्षण सांगितली आहेत, अर्थात् यात गुरू कसा नसावा, हे स्पष्ट केले आहे. 

         त्या सोप्या शब्दातील ओळीच बघु या.

         जे करामती दाखविती। 

         तेही गुरू म्हणिजेती। 

         परंतु ते गुरू नव्हेती।

         मोक्षदाते। ( नाहीत) ।।१।।

         सभामोहन मुररे चेटकें।

         साबरमंत्र कौटाले अनेके।

         नाना चमत्कार कौतुके।

         असंभाव्य सांगती  ।। २।।

         सांगती औषधप्रयोग।

         कां सुवर्णधातूचा मार्ग।

         दृष्टिबंधने लागवेगे।

         अभिलाषाचा  ।।३।।

     

    आता एकदम समास २०पासून

         

         जें जें मन अंगिकारी ।

          तें तें स्वयें मुक्त करी ।

         तो गुरु नव्हे, भिकारी- ।

          झडे आला ॥ २०॥

         शिष्यास न लविती साधन (शिस्त)।

          न करविती इंद्रियेंदमन ।

        ऐसे गुरु आडक्याचे तीन । 

        मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥

        जो कोणी ज्ञान बोधी । 

        समूळ अविद्या छेदी ।

        इंद्रियेंदमन प्रतिपादी ।

         तो सद्गुरु जाणावा ॥ २२॥

          येक द्रव्याचे विकिले  (आजचे कोचिंग क्लासेस)

           येक शिष्याचे आखिले 

             (शिष्य सांगेल तेवढाच portion शिकविणे)

          अति दुराशेने केले।

          दीनरूप  (शिष्यापुढे)  ।।२३।।

         जें जें रुचे शिष्यामनीं ।

        तैसीच करी मनधरणी (मस्कापॉलिसी) ।

       ऐसी कामना पापिणी ।

        पडली गळां । २४॥

        जो गुरु भीडसारु ।

       तो अद्धमाहून अद्धम थोरु ।

        चोरटा मंद पामरु ।

         द्रव्यभोंदु ॥ २५॥

        जैसा वैद्य दुराचारी ।

         केली सर्वस्वें बोहरी ।

         आणी सेखीं भीड करी । 

          ( तो)  घातघेणा ॥ २६॥

         तैसा गुरु नसावा । 

         जेणें अंतर पडे देवा ।

         भीड करूनियां, गोवा( गोंधळ)- । 

         घाली बंधनाचा ( कमी शिक्षण) ॥ २७॥ 

         हे महत्वाचे don'ts रामदास स्वामींनी आपल्या मार्गदर्शनासाठी सांगितले आहेत. ते तसे साध्या व सुबोध भाषेत आहेत. सहज कळण्यासारखे आहे नं? बघा हेही:-

         अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता।

         परीं  विषई लोलंगता।

         ऐसिया गुरूचेनि सार्थकता।

         होणार नाही। । ३१ । ।

         जैसा निरूपणसमयो।

         तैसेचि  मनही करी वायो।

         कृतबुध्दीचा जयो। 

         जालाच नाही। ।३२ । ।

         निरूपणी सामर्थ्यसिध्दी।

         श्रवण होता दुराशा बाधी।

         नानाचमत्कारे बुध्दी।

          दंडळूं लागे । ।३३ । ।

        वाचा सहज समजेल, अन् उद्या माझ्या पध्दतीने व माझ्या विचाराच्या दिशेने, यांवर स्पष्टीकरण करणारच आहे. पण तुम्हीही जरा समर्थ रामदास स्वामींना समक्ष व अपरोक्ष भेटावयाचा प्रयास करावा, ही अपेक्षा.

        तर उद्या या त्यांच्या उपदेशाचा मागोवा घेऊ या हं.

         अपरोक्ष शब्द बर्‍याच वेळेस उलट अर्थाने वापरला जातो. खरे तर जसे दोन नकार, " होकार" ठरतात. त्याप्रमाणे. परः+ अक्ष= डोळ्याच्या परे - मागे व "अ" लागल्याने, पुन्हा परोक्ष नसलेला= डोळ्या देखत. असा अर्थ होतो. माझी एक इच्छा आहे, तुम्हा वाचकांकडून अपेक्षा आहे, जमल्यास सर्वांनी थोडेफार संतवाङमय वाचावे. त्यासाठीच त्यातील, काही भाग, मी येथे देत राहणार आहे.  हे खरे कि, मी त्यांच्या कडून जे जे ज्ञान मिळते, ते ते आपल्यापर्यंत hand over 😉 करीत आहे. तुम्ही ते गोड मानून घेत आहात, हे माझे भाग्य! कर्ताकरविता  "तो " आहे.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू