सामाजिक कार्याची चुकीची तर्‍हा.

 ८.९ २०२३ सामाजिक कार्याची चुकीची पध्दत.

वाचक हो, तुमच्या वाढत्या संख्येमुळे, माझा हुरूप वाढत आहे. माझे लेखन आपल्याला भावते आहे, पटतेय, म्हणूनच तुम्ही माझ्या भेटीस येत आहात, हेच माझे यश आहे. आजचे शिर्षक वाचून गोंधळात पडू नका. त्याचे असे आहे. सर्व जण कार्य म्हणजे, अन्नदान मानतात. पण असे आहे, समोरच्यांची खरी गरज समजून घ्या व त्याप्रमाणे मदतीचा हात पुढे करा.सामाजिक कार्य हे कसे करायचे, आपल्या मनाने ठरवायचे नाही तर समोरच्यांची गरज व नड बघून करायचे. हो, गरज व नड ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. गरज सर्वांनाच असते, पण नड- म्हणजे ती पुरी करण्यास असमर्थता.
अाता मी माझा एक अनुभव सांगणार आहे. मी एका प्रख्यात सामाजिक संस्थेच्या मार्फत, मी डहाणूला, अादिवासी पाड्यात जात असे. नेहमी महिन्याच्या एका रविवारी, ३डॉक्टर,३शिक्षक व आम्ही ३ कार्यकर्ते , आळीपाळीने मुंबईतील वेगवेगळ्या भागातून जात असू. एकदा दिवाळीैला, बस ठरवुून बरेच जण दिवाळीचा फराळ घेऊन गेलो होतो. चिवडा व लाडू. सर्व मुलांना गोळा करून प्रत्येकाला, अशी लाडू व चिवड्याची वेगवेगळी पॅकेट्स दिली. मोठ्याना ही. मुलांना तेथेच खायला सांगितले. पण गंमत म्हणजे सर्वांनी लाडू खाल्ले. पण चिवड्याची पॅकेट्स तशीच न उघडता ठेवली. खरे तर या मुलांना गोड कमी आवडते. पण तिखट आवडीने खातात. म्हणून माझ्या मैत्रिणीने कुतुहलाने विचारले, हे का खात नाहीत, तर उत्तर मिळाले कि, घरातून ताकीद मिळालेय कि, चिवडा मोठ्यांना संध्याकाळी, का ते कळले ना, (चकण्यासाठी) पाहिजे होता. मग सांगा, हे सामाजिक कार्य होतेय कि, उलट नसत्या व्यसनांला भर दिली जातेय. म्हणून लिहितेय, जे कार्य कराल, त्याचे पुढे काय होते, त्याचा शोध घ्या व योग्य मार्गाने सामाजिक कार्य करा. आता तेथीलच आणखी एक उदाहरण सांगते. एकदा सर्व मुलांमुलींना, एका हॉलमध्ये जमवून, एक चिक्की व दोन टोस्ट दिले. पण खाण्या आधी, ” हे” गृहस्थ सांगतील, ते ऐका. असे जाहीर केले. ते हौशी वक्ते भाषणाला उभे राहिले. अन् संधीचा फायदा घेऊन, ” लेक्चरबाजी” सुरू – मग थांबेचना. मुले बिच्चारी! एका हातात चिक्कट चिक्की अन् दुसर्‍या हातात, घामाने मऊ होत जाणारे टोस्ट बघत, ऐकत होती. अन् ते सांगत होते, नेहमी खाण्याअाधी हात धूत जा, काय बोलायचे, जिथे पिण्याच्या पाण्याचे हाल तेथे हे सांगणे, म्हणजे – अक्कलेचा ~असो. म्हणून म्हणते, ज्यांच्या साठी काही कराल , त्यांची गरज व नड अाणि परिणाम विचारात घ्या. मग खरे पुण्य मिळेल.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू