काम छोटेसे, पण आशयाने मोठे व खरेच समोरच्यांची गरज भागणारे.
सुस्वागतम्, रसिक वाचक हो, आज मी तुम्हाला जे लिखाण करणार आहे. ते म्हटले तर मजेशीर आहे, पण जेव्हा आपण ,काही सामाजिक कार्य करण्याचे ठरवू, तेव्हा ते आपल्या कल्पनेनुसार न करावे, तर त्या व्यक्तीच्या गरजेनुसारच करणे, आवश्यक व योग्य आहे, पटते ना?
हा,आज मी एक गंमतीशीर अनुभव सांगणार आहे. मी मानस शास्राची पदवीधर आहे व नंतर मी चाईल्ड वेल्फेअरचा कोर्स केला. आम्हाला प्रक्टिकलमध्ये, अनाथाश्रम व रिमांड होम मध्ये जावे लागे. तेथे मुलांचे खेळ घेणे, गोष्टी-गाणी सांगावयाच्या असत. एका वेळी ४ जणी जात असू. एकदा सायनच्या चिल्डन होममध्ये, मी जरा उशीरा पोहोचले.
सर्व मुले, इतर दिदींच्या सोबत खेळत होती. मी काय करू, विचार करताना, समोर एका हॉलमध्ये अगदी छोटी मुले( वय ६महिने ते ३वर्षे) होती. मी सहज त्यातील एकाला कडेवर घेऊन फिरवले. तो खुशीने हसून टाळ्या वाजवू लागला. त्याला ठेवले व दुसर्याला उचलले. तोही मजेत आला. परत फिरले , तर सर्वच १०.१२ मुले हात वर करून, माझ्याकडे बघू लागली. मग त्या आयाने, मला विचारून, त्यांची लाईन लावली. मी प्रत्येकाला कडेवर घेऊन फिरवले. अर्थात् ( त्या काळात१९६९- १९७१ मध्ये डायपर हा प्रकार नव्हताच. साहजिक, मला नैसर्गिक प्रसाद मिळाला. ती आया बोलली, " दिदी आता हो." मी म्हटले, घरीदारी कोणाला घेते, तेव्हा असे घडतेच नं, तसेच हे, त्यात काय?" मग घरी आल्यावर आजींशी, आमच्यासकट,
सर्व जण तिला काकी म्हणत, बोलले कि, आज मला काहीच करायला मिळाले नाही. असे असे झाले. ती हसली व म्हणाली, " अग, हेच तर खरे काम. समजून घे. गाणी - गोष्टी - खेळ कोणीही घेईल. पण आज तू त्या लेकरांची खरी गरज पूर्ण केलीस. तेथे काम करणार्यांना, ह्यासाठी वेळ मिळत नसेल ग. पण लहान मुलांची ही गरज असते. मानस शास्त्र शिकतेस ना? मग समोरच्यांना , जे जे पाहिजे व जी ओढ आहे, ते देणे, हेच खरे कार्य व तिने तिचा अनुभव सांगितला, "मी सहसा कोणाला हे मोठेपणाने बोलले नाही. पण १९४२च्या लढ्यात ऑर्थर जेलमध्ये, गावोगावची कित्येक १३ ते १७ वर्षाची मुले, सरकारने पकडली होती व तेथील रिमांड होममध्ये ठेवली होती. आम्हाला, त्यांना अभंग सांगायची परवानगी मिळाली होती. पण या वयात घरापासून व आईपासून दूर झालेल्या मुलांना जवळ घ्यायची गरज असायची. ह्या मुलांना तर आई काय, हेच समजले नाही. तू हेच कर." मग काय! दररोज माझी ," घोडेस्वारीची रपेट सुरू. पण आज त्याची किंमत कळते. काकी ( आजी) च्यामुळे हे सत्कार्य माझ्या हातून घडले. अन् ही कायमची शिकवण मिळाली कि, सामाजिक कार्य हे कसे करायचे, आपल्या मनाने ठरवायचे नाही तर समोरच्यांची गरज व नड बघून करायचे. हो, गरज व नड ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. गरज सर्वांनाच असते, पण नड- म्हणजे ती पुरी करण्यास असमर्थता. मी एक सांगते. आता नवरात्री येतील. तेव्हा महिलांनी एकमेकांना सवाष्ण बोलावण्यापेक्षा, एखाद्या गरीब महिलेला, पंचपक्वान्न खाऊ घालावेत. खरे पुण्य मिळेल. मग तिची वैवाहिक स्थिती बघू नये. मला माहीत आहे, हे पटेल, पण वळणार नाही. असो.पण तरी सुध्दा जरा आपल्यात बदल करा हो. मग तर असेही साधे काम असेना, अन् आपल्या ह्या विचाराचा सर्वदूर प्रसार करा.
Comments
Post a Comment