करूणाष्टके.प्रारंभ. रामरक्षेच्या अध्ययनासोबत ह्या समर्थरामदासस्वामींच्या कवनाचा परिचय करा.
११. १ .२०२४ .करूणाष्टके. प्रारंभ.
रामरक्षेच्या अध्ययना बरोबरच,आता समर्थरामदासांच्या, समर्थ अशा काव्याचा परिचय करू या.
मत्प्रिय धर्मनिष्ठ वाचक वृंद हो, आजचा विषय, रामराज्यच आहे. मी तुम्हाला, धर्मनिष्ठ म्हणून हाक दिली, ती अशी कि, धर्म म्हणजे हिंदू - मुस्लिम- ख्रिश्चन-पारशी- बौध्द या अर्थी नव्हे, तर धृ इति धारयती- आपले कर्तव्य, मातृकर्तव्य- पितृकर्तव्य, पुत्र कन्या कर्तव्य, गुरू- शिष्य कर्तव्य तसेच राजा प्रजा कर्तव्य या अर्थी लिहिले. जर आपल्या, न्यायनिष्ठ व उत्कृष्ट, राजा शास्ता हवा तर, आपणही प्रजा व नागरिक म्हणून योग्य आचरण करणे, आवश्यक आहे ना?
तर समर्थरामदास स्वामी, आपल्या सर्वांच्या वतीने, त्या परमेश्वराकडे, याचना करीत आहेत. या शब्दातील एक अक्षर बदलले, तर केवढा मोठ्ठा अनर्थ होतो, बघा. ,"च" चा "त" केला, तर "ध" चा "मा" ची गत होते बघा. हे एतिहासिक सत्य सर्वांना माहीत आहेच. तर कोणाही सन्मार्गी व्यक्तिला , यातना होऊ नयेत, हीच याचना, ते करीत आहेत. तेव्हा प्रत्येक, मागणीत, स्वतःला बसवून ही, करूणाष्टके वाचू या.
अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥
विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥
तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥
जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥
सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥
जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥
तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥
हे कवन सरळ सहज सुलभ आहे. ते वाचताच आकलन होते. मग मी काय समजून सांगू. मनापासून व ह्रदयापासून वाचा, ही कळकळीची विनंती. जमल्यास, हे छोटेसे पुस्तक मिळवून, दररोज ५ ते १० श्लोकांचे वाचन व पठण करा. फक्त ५मिनिटे लागतील हो. तर उद्या पुढील करूणाष्टके, लिहून,तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे. त्या नुसार वाचा व इतरांना वाचण्यास सांगा. म्हणजेच like& share. 🙏🙏🙏.
Comments
Post a Comment