माऊली, आषाढी एका दशी व पंढरपूर वारी.
7 जुलै 2025. माऊली आषाढी एकादशी - पंढरपूर वारी.
रसिक व भाविक वाचक हो, आपण सर्वच विठोबाचे भक्त आहोत. वारीला जावो वा न जावो. विठू रायाला कोण भजत नाही. शेकडो वर्षे वारीला, लाखो लोक पंढरपुरास जमतात. पण कधी, संपूर्ण महाराष्ट्रातून. पण कधी या वारीत चेंगरा. चेंगरी झालेली ऐकलेय का? कदापि नाही. कारण ही भक्त मंडळी, एकमेकांना, " माऊली "च मानतात. मग कोणी धक्का.बुक्की कशी करणार? दररोज तुम्ही, माझा लेख वाचता, आज या वरचा श्री. विलास देशमुख, यांचा लेख वाचा. मोठा आहे पण तेवढाच महान व अर्थ पूर्ण आहे.
माऊली
चाकणला सप्लायर विझीट होती.सकाळीच मुंबईहून निघालो.कंपनीतले सहकारी बरोबर होते. चाकणला पोहोचायला अकरा वाजले.प्लांट विझीट झाल्यावर जेवणाचा कार्यक्रम.पुढे अॉडीट संपेपर्यंत चार वाजले.
रात्री पुण्यात हॉटेलवर मुक्काम होता.
चाकणहुन पुण्याला येताना मध्ये आळंदी लागते ह्याची माहीती आधीच काढुनी ठेवली होती.
संध्याकाळ होत आली होती.आळंदी जवळ आल्याचे रस्त्यावरचे फलक सांगू लागले.पार्कींग मध्ये गाडी लावून आम्ही समाधी मंदीराकडे निघालो.
नदीकाठी दुकानांची रांग. पुढे आले की मुख्य मंदीराचे प्रवेशद्वार.आत प्रवेश करून संजीवन समाधीचे दर्शन घेतले.दिवसभराच्या प्रवासाने आणि कामाने थकलेले आम्ही धर्मशाळेच्या पायरीवर बसलो.
निघायची घाई होती.ईतक्यात एक वारकरी आमच्या पायांना स्पर्श करून आम्हाला "माऊली" म्हणाला.नमस्कार करून पुढे निघुन गेला. ना ओळखीचा ना पाळखीचा.
स्वत: कमीपणा घेऊन समोरच्या माणसाला मान देणे .माऊली म्हणणे ! शहरात रहाणाऱ्या आम्हा लोकांना हा अनुभव नवीनच होता.आम्हाला ओशाळल्यासारखे झाले.तो प्रकार पाहून आम्ही नकळत आणखी थोडावेळ तेथे रेंगाळलो.
वारकरी अशा प्रकारे नमस्कार करुन एकमेकांना "माऊली" संबोधतात.ही प्रथा आम्हाला नंतर कळली.
बाजूलाच असलेले माऊलींचे समाधी मंदीर.त्यात दर्शनाला येणाऱ्या भक्तांची वर्दळ.ह्या वातावरणात आठवले ते भीमसेनजींनी गायलेले गाणे.
"इंद्रायणी काठी,देवाची आळंदी".
लहानपणी आजोबांच्या तोंडुन ऐकलेल्या हरीपाठातल्या ओळी सहज आठवल्या.
"देवाचीये द्वारी,उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या".
रेडीओवरचे लता दीदींनी गायलेले गाणे.
"रूणू झुणू रूणू झुणू रे भ्रमरा,सांडी तू अवगुणू रे भ्रमरा"
तसेच आठवण झाली "पसायदानाची".
दिवसभराच्या दगदगीत हा तासाभराचा विसावा मनःशांती देऊन गेला.प्रसन्न मनाने आम्ही पुण्याकडे निघालो.मनावर माऊलींचा ठसा उमटवून.
हॉटेलवर पोहोचायला थोडा उशीरच झाला.
काळोख पडला होता. मी तयार होऊन बाहेर जाणार आहे हे सहकाऱ्यांना आधीच सांगुन ठेवले होते.
माझे पुर्वीच्या कंपनीतले साहेब निवृत्त झाले होते.सध्या ते पुण्यात रहात होते. बरेच दिवसांनी/वर्षांनी भेटण्याचा योग आला होता.त्यांना फोन करून मी पुण्यात येणार आहे हे कळवले होते.
सर्व सहकारी तयार होऊन फेरफटका मारायच्या तयारीत होते. इतक्यात माझा फोन वाजला.साहेबांचा फोन होता."पोहोचलास का रे?"समोरून विचारणा झाली." हो साहेब ,"मी तुमच्याकडेच यायला निघालोय,मला फक्त रिक्षावाल्याला काय सांगायचे ते सांगा"
लगेच समोरून आवाज आला."मला एक सांग तू कूठल्या हॉटेल मध्ये उतरला आहेस?" मी हॉटेलचे नाव व पत्ता सांगीतला.मला प्रेमळ दटावणीच्या स्वरात म्हणाले."तू तीथेच थांब." साहेबांचीच अॉर्डर ऐकणे ओघाने आलेच.
सात आठ मिनीटे झाली असतील.हॉटेलच्या दारात एक आलिशान गाडी येऊन उभी राहीली.
गाडी कुणाची म्हणून सहज पाहिले तर साहेब स्वतः गाडी घेऊन आले होते.दारात सहकाऱ्यांच्या सोबत उभ्या असलेल्या मला त्यांनी हात करून बोलावले.हे पाहून आश्चर्यचकित व्हायची पाळी सहकाऱ्यांवर आली होती.
स्वतः साहेब आपल्याला न्यायला आले हे पाहून मलाही ओशाळल्या सारखे झाले.गाडीत बसताना मी म्हणालो "साहेब कशाला तसदी घेतलीत.मी रीक्षाने आलो असतो". तेच मिशीतले मिश्कील हास्य चेहऱ्यावर आणून म्हणाले "अरे बस रे!".
घरी येताच त्यांच्या पत्नीने हसून स्वागत केले.
भव्य दिवणखान्यात बसून चहा घेताना झालेल्या गप्पा!जुन्या आठवणी! एक स्वर्गीय अनुभव!
घरच्या मंडळींची आवर्जून केलेली विचारपूस.मुलांच्या शिक्षणा बद्दलही आत्मीयतेने केलेली चौकशी.अॉफिसमधले कोण कोण केंव्हा भेटले,आता कुणाचे कसे चालले आहे ह्यावर चर्चा रंगली. ह्या गप्पा जेवतानाही सुरू होत्या.जेवण संपले. सहज घड्याळाकडे लक्ष गेले.दहा वाजून गेले होते. पुण्याची प्रसीद्ध शुसबेरी बिस्कीटांची बशी समोर आली होती.
बिर्याणी च्या जेवणा नंतर स्विट डीश म्हणून खाल्लेल्या शुसबेरी बिस्कीटांची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे.
मी उभयतांचा निरोप घेउन जायला निघालो.
माझ्या बरोबर दोघेही लिफ्टने खाली आले व मला गाडीकडे नेऊन म्हणाले बस. स्वतः गाडी चालवत मला हॉटेलपर्यंत सोडायला आले. पुन्हा येण्याचा आग्रह झाला.हॉटेलच्या बाहेर निघुन जाणाऱ्या गाडीकडे मी पहात राहिलो.
एका बहुराष्ट्रीय कंपनीचे उच्चपदस्थ आपल्या जुन्या कनिष्ठ सहकाऱ्याला एवढा मान देतात.हे पाहून दारात माझी वाट पहात उभ्या असलेल्या सहकाऱ्यांना नक्कीच माझा हेवा वाटला असणार.
हॉटेलच्या बेडवर पडल्या पडल्या विचार करीत होतो.आज मला तीन माऊली भेटल्या होत्या.
एक, संजीवन समाधीच्या रूपातले "ज्ञानेश्वर माऊली".
दुसरा,स्वतः कमीपणा घेऊन नमस्कार करणारा देवळात भेटलेला "वारकरी माऊली".
तीसरे, माऊली आमचे "साहेब".
ह्या तिन्ही व्यक्तीरेखांमधला दुवा शोधण्याचा मी प्रयत्न केला.तेंव्हा मला असे दिसून आले की हे दुसरे तीसरे काही नसून,आपल्या संतांची शिकवण आहे.सर्वांशी चांगले वागा. मैत्रीपुर्ण संबंध ठेवा.
आजच्या धकाधकीच्या जीवनातही चांगुलपणा टिकून आहे तो याच जोरावर. नकळत ही शिकवण आपल्या स्वभावात संस्कार रुपाने पाझरत आली आहे.अजुनही टिकून आहे.
"जे खळांची व्यंकटी सांडो |
त्या सत्कर्मी रती वाढो |
भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे|"
माऊलींच्या पसायदानातल्या ओळी गुणगुणत झोप केंव्हा लागली ते कळलेच नाही.
विलास देशमुख
बोरीवली, मुंबई
९८२०३७२६७१
Comments
Post a Comment