अगदी काही करता आले नाहीतरी, कोणाच्या धडपडीचे कौतुक करा

 अगदी काही करता आले नाहीतरी कोणाच्या धडपडीचे कौतुक करा.

    माझ्या प्रिय वाचक हो, आज  आठ दिवस, मी तुम्हाला समाजासाठी काहीतरी कराच, असा उपदेश करतेय. पण निदान ते जमत नसेल, तर कोणाच्या धडपडीचे कौतुक करा त्यांना, प्रोत्साहित करा. त्याला काही खास प्रयत्न करावे लागत नाही. त्या साठी, मी सौ. योगिता नारकर यांनी, केलेले, एका पुस्तकाचे परीक्षण वाचवयास देत आहे. एका आईची, special child साठी, चिकाटी व हिंमत ठेवून, केलेले प्रयास, योगिता मॅम, सांगत आहे. असे कौतुक करा हो. बस, ही विनंती.

पुस्तक परिक्षण - सौ. योगिता नारकर.

    पुस्तक:- माय अमेझिंग चाईल्ड. 

          लेखिका:- मनीषा अगावणे. 

      आपल्या बौध्दिक अपंगत्वावर मात करून, यशाची अधिकाधिक शिखरे पार करणार्‍या, " सायली अगावणे कहाणी खरेच प्रेरणादायी आहे. 

      " अमेझिंग चाईल्ड, सायली, हे आत्मचरित्र, सौ. मनीषा नंदकिशोर अगावणे, यांच्या वैयक्तिक डायरीतून साकारले  आहे. शशिकला उपाध्ये यांनी या गोष्टीचे नेटके व ओघवते शब्दांकन करून ते पुस्तक रूपाने प्रसिध्द केले आहे.

      मनीषा व नंदकिशोर हे एक मध्यमवर्गीय दांपत्य. त्यांना झालेले पहिले अपत्य  म्हणजे, ' सायली', तिच्या जन्मानंतर लगेचच ती डाऊन सिंड्रोम असल्याचे समजल्यावर, तिच्या घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली होती. पण कोणीही नशिबाला किंवा देवाला दोष दिला नाही. आणि सायलीचे वेगळेपण त्यांनी स्विकारले. नंदकिशोर यांनी तर, सामान्य मुलांना कोणीही घडवू शकतं, आपल्याला देवाने वेगळी संधी दिली आहे. आपण या संधीचे सोने करू, या शब्दात, मनिषाताईंना धीर देत, त्य‍ांची समजूत काढली होती. घरातील सर्वांनीच, मनीषाताईंना पाठिंबा देत,  सायलीला घडविण्यासाठी खंबीर बनवले.

      सायलीची अनुकरणातून शिकण्याची वृत्ती लक्षात आल्याने, मनीषाताईंनी व नंदकिशोर यांनी दुसराच विचार केला आणि सायलीची धाकटी बहीण, जुईलीचा जन्म झाला. त्यामुळे सायलीची जडणघडण वेगाने होऊ लागली. जुईलीच्या अनुकरणातून, सायली, स्वतःची दिनचर्या पार पाडायला शिकली.

      जुईलीला पुढे कथ्थकच्या क्लासला घातले. तेव्हा सायलीसुध्दा, क्कासला जाऊ लागली. बाहेर बसून, खिडकीतून, ती त्यांचा डान्स पहात असताना, अचानक तिचीही पावले, मनीषाताईंना थिरकताना दिसली. मग त्यांनी धीर करून, जुईलीच्या नृत्य शिक्षिकेकडे, सायलीलाही नृत्य शिकवण्याची विनंती केली. त्यांनी सुध्दा ती लगेच मान्य केली. आणि सायलीचा नृत्यप्रवास सुरू झाला. 

      इता मुलांच्या मानाने ती उशीरा शिकत होती. पण एकदा शिकलेले व्यवस्थित लक्षात ठेवायची. शिवाय जुईली ही घरी सायलीची प्रक्टीस घेत असे. त्यातूनच पुढे शामक दावरच्या वेस्टर्न डान्स क्लासला सायलीने प्रवेश मिळवला. देश. विदेशच्या अनेक ठिकाणी, तिला नृत्य सादरीकरणाची संधी मिळाली. बँकाॅक, मलेशिया, थायलँड, सिंगापूर या ठिकाणी, तिला ब्रांझ पदक मिळाले. लिम्का बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड', मध्ये, तिच्या नावाची नोंद झाली. भारत सरकारतर्फ़े, तिला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दूरदर्शनवर, " वा रे वा", "इंडियाज् डान्सिंग सुपरस्टार", " एन्टरटेंट के लिए कुछ भी करेगा," झलक दिखला जा" इत्यादी कार्यक्रमांमध्ये, सर्वसाधारण मुलांना टक्कर  देत, तिने तिची कला यशस्वीरित्या सादर केली. सायलीला घडविण्यात, मनीषाताईंनी कुठलीही कसर सोडली नसल्याने, अनेक ठिकाणी त्यांचा, "आदर्शमाता" म्हणून सत्कार झाला. अशा मुलांना घडविताना, स्वतःला संयमी बनवण्यासाठी, त्यांनीसुध्दा, त्यांच्या छंदाला प्राधान्य दिले. यासाठी त्यांनी ब्युटीपार्लर, सॉफ्ट टॉईज,मेंदी,  रांगोळीचे क्लास केले. पुढे ब्युटी पार्लरच्या माध्यमातून, त्यांनी, तिनशेहून अधिक, मुलींना, स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांच्या रांगोळीमधून सायलीला चित्रकलेचे प्रोत्साहन मिळाले व ती नृत्याबरोबरच, उत्तम पेंटींग साकारू लागली. तिच्या सर्व नृत्य कार्यक्रमाच्या वेळी स्वतः काढलेले पेंटींग्स तिने परिक्षकांना भेट म्हणून दिली आहेत. मनीषाताईंनी, सायलीला, डान्स अॅकेडमी काढून देऊन, तिला तिच्या पायावर उभे केले. आज सायली पुण्यात, तिच्यासारख्खा मुलांना कथ्थक व वेस्टर्न डान्स शिकवते.

       अनेकदा आयुष्यात, चांगल्या माणसांसोबत निंदकांचा ही समावेश असतो. सायलीच्या वेगळेपणामुळे, लोक तिला हसायचे. तिला प‍ाहून आपापसात कुजबुजायचे. काही तिच्या पालकांबद्दल सहानुभूती दर्शवायचे. पण त्यांनी न खचता, सायलीला घडविण्याचा निर्धार पक्का केला व त्या अनुषंगाने वाटचाल सुरूच ठेवली.

       तर अशा या सायलीला सहानुभूती देण्यापेक्षा , तिला खंबीर बनवणार्‍या तिच्या पालकांचा, तिच्या शालेय शिक्षक, नृत्यशिक्षक, तिचे सवंगडी यांचा संघर्ष, समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. सायलीसारखी विशेष मुले सर्वच गोष्टी फार उशीरा शिकतात. पण कायमस्वरूपी लक्षात ठेवतात. ही मुले फार निरागस व प्रेमळ असतात. स्पर्धा चढाओढ याचा त्यांना मागमूसही नसतो. त्यांची गुण वैशिष्टे जाणून घेण्यासाठी तरी, हे पुस्तक नक्की वाचावे. 

       अगदी साधी सोपी चित्र डोळ्यासमोर उभे करणारी भाषाशैली आहे, या पुस्तकाची. या पुस्तकातील काही जागा तर इतक्या भावस्पर्शी आहेत की, डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. सर्वांनी नक्की वाचावे, असे आहे हे पुस्तक.


सौ. योगिता नारकर.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू