12मार्च :1993, असंख्य बॉम्ब स्फ़ोट. हा मुंबईकरांच्या, नव्हे तर पूर्ण भारताच्या आठवणी तील काळा दिवस.
12.मार्च 2026.मुंबईकरांसाठी काळा दिवस. 12मार्च 1993.
माझ्या सुजाण व विचारी वाचकहो आठवतोय नं, तो दिवस, sorry, कोणीही भारतीय, ती घटना विसरूच शकणार नाही
आज मी खूप दुःखदायक आठवणीत आहे. तसे पाहिले तर मुंबईत ही घटना ( बॉम्बस्फ़ोट ) पूर्ण भारतासाठी तो दिवस वेदनामय होता. मुंबईत अनेक ठिकाणी, धडाधड स्फ़ोट घडवले गेले.
मी तेव्हा ऑडिटसाठी, पालघरला होते. अं हं, ते काही नशिब नव्हते, मी व माझ्या सोबत मीना शहा. जात असू. आणि चार जण जेन्टस. आमची मुले व परिवार मुंबईतच होते हो.मी माहीमला व ती पार्ल्यात राहत होती.बाकीची भांडुपला रहात होते..
अचानक 2.30 वाजता,तिथे पालघरला मला बैचैनी वाटली. काहीतरी काहूर मनी दाटले. मी मीनाला बोलले, "मला कसेसेच होतेय. असे वाटले, आता घरी जावे ", ती म्हणाली,"नेमके काय होतेय, बरे नाही का?"
आणि थोड्याच वेळात, कोणीतरी बातमी आणली, मुंबईत, अनेक ठिकाणी बॉम्ब स्फ़ोट होत आहेत. आम्ही हादरलो. दोघी डेरी ( जिथे ऑडिट चालू होते ) त्यांना म्हणालो, आत्ताच कसेही करून आमची मुंबईला जाण्याची सोय करा. ". पण ते शक्य नव्हते..
आता हा माझा अनुभव आत्मिक की दैवीक देव जाणे. माझ्या बाबतीत घडले काय की, माझा मुलगा, प्रशान्त वरळीला BIT मध्ये डिप्लोमा करत होता. हे स्फ़ोट झाले व कॉलेज सोडले. तो मेन रोडला आला. तेथे सामसूम. लांब पलीकडे एक बस जळताना दिसत होती, आणि सहज ओढीने तो मनात, आई आई, हाक देत होता. आणि त्याच वेळी (2.30) मला पालघरला बैचेनी जाणवली. पण सुदैवाने, तेथे एक गाडी आली. त्या सदगृहस्थाने थांबून, त्याला विचारले," कोठे जायचेय तुला? "
" माहीमला " " अरे बापरे, तेथे नाय, पण मी तुला शिवाजी पार्कला सोडतो. बस, लवकर.
जणू देवच भेटला.
तेथे माझा भाऊ राहत होता.
माझा धाकटा मुलगा दादरच्या शाळेत जाई. त्यांनी, लवकर शाळा सोडून,स्कुल बसने, आतल्या रस्त्याने, मुलांना, घरपोच सोडले.
पण प्रत्यक्ष पाही पर्यंत आम्हाला काही कळायचा मार्ग नव्हता. म्हणून मोबाईलला नावे ठेवतात, पण आज त्यामुळे किती सोय झालेय हो.
घरी आल्यावर,दोघांना पाहिले,जवळ घेतले आणि शांत झाल्यावर,, एकेक बहीण वगैरे नाती आठवली.
तर आम्ही पालघरला निघण्याच्या तयारीत बसलो होतो. वेळ जात होता. आणि अचानक कळले आधीची एक मुंबईला जाणारी गाडी पालघर स्टेशनला अडकलीय. आम्ही लगेच निघालोच. त्या ट्रेनला जबरदस्त गर्दी होती. पण आम्ही, समोरच्या जेन्टस डब्यात कसेतरी घुसलो. गाडी लवकर सुटो. म्हणून देवाकडे मागत होतो. पण ती काही सुटेना.
खरे तर आमच्या आयुष्यात, एक मोठी घटना घडायची होती. आंम्ही आमच्याच tension मध्ये असताना, आमच्या सर्वांच्या हातून एक पुण्य कार्य घडायचे होते.
झाले असे, की ज्या प्रकारे तेथे माझ्या मुलांची कोणीतरी काळजी घेतली तशीच.....
गाडी सुटणार, इतक्यात, एक तिशीची बाई, दोन लहानग्या मुलींना घेऊन आमच्या डब्यात चढली.. तिची जखमी अवस्था व मुलींना ही हाताला वगैरे लागलेले पाहून दारातील लोकांनी तिला घाईने आत घेतले. आम्ही दोघी व पालघरच्या एक शिक्षिका दोन सिटच्या मध्ये बसलो होतो. तेथेच लोकांनी, त्या तिघींना सोडले. आणि त्या शाळेत बाईंना, बघा जरा यांना ", असे कोणीतरी म्हणाले.
त्या दोघी मुलींना आम्ही, मी व मीनाने मांडीवर घेतले.. शिक्षिका बाईंनी, त्या बाईची बसायची सोय केली
माझ्याकडे नेहमी बँडेज व औषधे असतात.
त्यांना, जरा उपचार केल्यावर, कोणी तरी त्या मुलींना बिस्किटे वगैरे दिली. खिडकीतून कोणीतरी चहा दिला. टीसी आला. ती घाबरली, म्हणे, माझ्या कडे तिकिटी नाहीत. पैसे बी नाहीत साहेब, तर तो म्हणे," बाय, काही नको. मीच चायवाल्याला पाठवले होते. काहीतरी गडबड वाटतेय बाई! जरा बघा.. आणि चौकशी केल्यावर, जे कळले, त्याने सर्वांना धक्काच बसला. तोपर्यंत माझ्या मांडीवरील, छोटी झोपली होती
घडले होते असे. ती बाई परत तिसऱ्या वेळा गरोदर होती. आणि गर्भ परीक्षा केली. तर आताही मुलगीच होणार होती., म्हणे. हिने पुढच्या प्रकाराला, नकार दिल्याने, तिघींना मारहाण करून घरा बाहेर काढले, अरे देवा! मुख्य म्हणजे त्याकाळात, पालघरसारख्या गावात ही असला प्रकार होत असे. असो.
त्या वेळी तिला मदत करणे, महत्वाचे होते. तिला विचारले, आता कोठे जाणार, तर म्हणे. माहीमला, कोणीतरी नातलग राहतो. पत्ता माहित नव्हता. तिला मीनाने, विचारले, माहेर कोठे आहे, तर दूर पंढरपूरला. पण तिकिटी कशी काढू?
:तेव्हा सर्वांनी ठरवले. तिला या परिस्थितीत माहेरी जाणेच योग्य. सर्वांनी भरभर पैसे जमवले, शाळेतील त्या बाईंनी, तिला, सिद्धेश्वर ट्रेन मध्ये बसवण्याची जबाबदारी घेतली. सोलापूर ते पंढरपूर बस साठी पैसे ही जमा केले होते.
या पूर्ण वेळ सहज क्रिया म्हणून, त्या धाकलीला थोपटत होते. ती मोठी मीनाच्या मांडी वर बसून माझ्या वेणीशी खेळत होती. हो त्या वेळी, माझे केस खूप लांब होते. तिच्या हाती सहज येत होते. पण गाडीच्या धक्का मुळे कधी कधी खेचले जात होते. पण मी लक्ष दिले नाही.
तुम्ही म्हणाल, हे डिटेल मध्ये कशाला लिहिलेय.
तीच तर गोम आहे. ही घटना, इथे संपली. नाही हो.
2023 मध्ये ( 30 वर्षानी ) असे काही घडले, की देव आहे यावर माझा विश्वास वाढला.
ती अद्भुत व चमत्कार युक्त गोष्ट उद्या सांगेन.
[ ] ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment